शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

प्रेम/ सुधीर मोघे


दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागून कधीच मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या बधिर मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तरहा असतात
सा~या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात


प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरं तर काहीच महत्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुळ्या सोनेरी उन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं


मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२

बालकवि / कुसुमाग्रज

रे अमर विहंगम ! गगनाचा रहिवासी
त्या नीलसागरावरचा चतुर खलाशी !
प्रिय सखा फुलांचा, ओढ्याचा सांगाती
त्यांच्यास्तव धुंडुनि ताराकण आकाशी
आणशी धरेवर अक्षर या धनराशी!

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

कालचा पाऊस / यशवंत मनोहर

कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे
कालपर्यंत पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत
झाडे करपली, माथी हरपली
नदीच्या काठाने मरण शोधित फिरलो
आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही...

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

जोगडे / बा. भ. बोरकर

आम्ही सोंगाडॆ जोगडे । गळागंगेत कोरडॆ ।
सर्व दिशांच्या देशांच्या । नित्य दारांपुढे खडे ॥

हाती भिकेचा कटोरा । मुखी अध्यात्माची भाषा ।
ताटी निर्माल्य-विभूत । कोण वाढील ही आशा ॥

भीक वाढी त्याला घालू । क्रुद्ध आकाशाचा धाक ।
सुणे सोडी अंगावर । त्याच्यापुढे धरू नाक ॥

आणलेल्या भिकेपायी । घालू एकमेकां शिव्या ।
लोणी गटवाया आणू । रोज रव्या नव्या नव्या ॥

भीक घालणारा आहे । आम्ही तोवर जोगडॆ ।
भाव रुद्राक्षा अजून । भाग्य आमुचे केवढे! ॥


बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

तुझी वाट चुकणार नाही / कृ. ब. निकुंब

तुझी वाट चुकणार नाही या माझ्या मयसभेत
थबकणार नाहीस तू भव्य महाद्वाराशी
सप्तरंगी उन्हात झळको खुशाल त्याचे गोपुर!
तुला माहीत आहे कुजबुजणारी अंधुक वाट
वळणावळणाने जाणारी, श्वासाने उबदार होणारी
महाद्वारातून जाणारे फसव्या प्रपाताचे कौतुक करीत
नसत्या हिरवळीवर कोसळतील
त्यावेळी तू पोहोंचलेली असशील, अचूक
कमळाच्या तळ्यावर, धुंद धुक्यात लपलेल्या...
राजरस्ता, महाद्वाराकडून येणारा
कित्येक योजने दूर आहे या तळ्यापासून
कधीमधी-म्हणतात-भांबावून जातो
त्यातून वावरणा~याना
ह्या गूढ कमळांचा मुग्ध सुवास!
महाद्वारांनी जाणारांसाठी महाद्वारे आहेत-
तुझ्यासाठी
आहे ती श्वासांची वाट या माझ्या मयसभेत!!