बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

तुझी वाट चुकणार नाही / कृ. ब. निकुंब

तुझी वाट चुकणार नाही या माझ्या मयसभेत
थबकणार नाहीस तू भव्य महाद्वाराशी
सप्तरंगी उन्हात झळको खुशाल त्याचे गोपुर!
तुला माहीत आहे कुजबुजणारी अंधुक वाट
वळणावळणाने जाणारी, श्वासाने उबदार होणारी
महाद्वारातून जाणारे फसव्या प्रपाताचे कौतुक करीत
नसत्या हिरवळीवर कोसळतील
त्यावेळी तू पोहोंचलेली असशील, अचूक
कमळाच्या तळ्यावर, धुंद धुक्यात लपलेल्या...
राजरस्ता, महाद्वाराकडून येणारा
कित्येक योजने दूर आहे या तळ्यापासून
कधीमधी-म्हणतात-भांबावून जातो
त्यातून वावरणा~याना
ह्या गूढ कमळांचा मुग्ध सुवास!
महाद्वारांनी जाणारांसाठी महाद्वारे आहेत-
तुझ्यासाठी
आहे ती श्वासांची वाट या माझ्या मयसभेत!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा