सोमवार, ३० जानेवारी, २०१२

आणीबाणी / अनिल

अशा काही रात्री गेल्यां ज्यांत काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या, होतो तसे उरलो नसतो
वादळ असे भरून आले, तारू भडकणार होते
पाटा अशा घेरत होत्या, काही सावरणार नव्हते!
ह्रपून जावे भलतीकडेच, इतके नव्हते उरले भान,
करपून गेलो असतो इतके पेटून आले होते रान!
असे पडत होते डाव, सारा खेळ उधळून द्यावा;
विरस असे झाले होते, जीव पुरा विटून जावा!
कसे निभावून गेलो, कळत नाही, कळले नव्हते
तसे काही जवळ नव्हते-नुसते हातीं हात होते!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा